ज्ञान
पृथ्वीवर ज्ञानाशिवाय अशी दुसरी कोणतीही वस्तु नाही, की जिचा कंटाळा न येतां, किंवा जिच्यापासून शरीरास किंवा मनास कोणतीही व्याधि न जडतां, जिच्या योगानें वृत्ति आमरण आनंदमय राहू शकेल. जे पुरुष ज्ञानसंपादनांत निमग्न झालेले असतात, त्यांसच या अमोलिक सुखाचा निरंतर लाभ होतो. विश्वाच्या विशाल स्वरूपाच्या विचारांत जो गढून गेला व ज्याला ही पृथ्वी एखाद्या क्षुल्लक वारुळाप्रमाणे …